नक्षलवादाच्या अंधारातून विकासाची नवी पहाट; गडचिरोलीची ऐतिहासिक भरारी

1

नक्षलवादाच्या अंधारातून विकासाची नवी पहाट; गडचिरोलीची ऐतिहासिक भरारी
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; जनजातीय गौरव दिनी ३ हजार कोटींच्या २४६ विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : नक्षलवादाच्या हिंसक सावटातून बाहेर पडत गडचिरोलीसह देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा पोहोचत असून आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते देशभरातील सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा येथील आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी योजनांमुळे घडलेल्या परिवर्तनाची माहितीही घेतली.
या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

‘वंचितांना प्राधान्य’ देत विकासाचा संकल्प

पंतप्रधान मोदी यांनी ‘जोहार’ या पारंपरिक अभिवादनाने भाषणाची सुरुवात केली. भगवान बिरसा मुंडा, बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, राणी दुर्गावती आणि टंट्या भिल्ल यांसारख्या आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाचे स्मरण केले.
नक्षलवादामुळे अनेक दशके विकासापासून दूर राहिलेल्या भागांत आता शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी वस्त्यांपर्यंत पक्की घरे, पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील २२ आश्रमशाळा व वसतिगृहांशी संबंधित सुविधांचाही समावेश आहे.

तीन लाभार्थ्यांच्या यशकथा ठरल्या प्रेरणादायी

यवतमाळमधील कोलाम आदिवासी कृष्णा टेकाम यांनी पीएम जनमनमधून पक्के घर मिळाल्याने जीवनमान उंचावल्याचा अनुभव सांगितला. गुजरातमधील वजीरभाई कोतवालिया यांनी बांबू हस्तकलेच्या प्रशिक्षणामुळे आपले मासिक उत्पन्न सात-आठ हजारांवरून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत वाढल्याचे सांगितले. तर तेलंगणातील सबावत अन्वेष याने एकलव्य निवासी शाळेतून शिक्षण घेत आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळविल्याची यशोगाथा मांडली. या उदाहरणांतून आदिवासी युवकांसाठी शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

गडचिरोली महाराष्ट्राचा विकासातील पहिला जिल्हा बनेल : फडणवीस

गडचिरोलीची नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा ही ओळख पुसली जात असून हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, तर विकासाच्या बाबतीत पहिला जिल्हा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील खनिज संपत्तीच्या आधारे गडचिरोलीला देशाची पुढील ‘स्टील सिटी’ बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे. पोलाद उद्योग आणि औद्योगिक गुंतवणुकीतून स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. औद्योगिक विकासासोबतच जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करण्यावरही भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाल्याचा दावाही त्यांनी केला.

आदिवासी अस्मिता जपत सर्वांगीण विकास साधा : राज्यपाल

आदिवासी समाजाचा विकास करताना आर्थिक प्रगतीसोबतच त्यांची संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपणे आवश्यक आहे, असे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, तर पारंपरिक कला, नृत्य, संगीत आणि हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गडचिरोलीला देशातील प्रमुख ‘स्टील हब’ बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. उद्योग, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जतन करण्यासाठी घोषित केलेल्या ११ संग्रहालयांपैकी पाच संग्रहालयांची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती दिली. पीएम जनमन, धरती आबा अभियान आणि एकलव्य निवासी शाळांमुळे आदिवासी विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आदिवासी संस्कृतीचा रंग, शौर्याचा गौरव

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी प्रास्ताविकातून जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्याचे गडचिरोलीत आयोजन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी नृत्य, सांस्कृतिक सादरीकरण आणि जनजातीय गौरव पदयात्रेने विशेष रंगत आणली. मान्यवरांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात तयार केलेली भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
नक्षलवादाच्या सावटातून विकासाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीसाठी हा सोहळा ऐतिहासिक ठरला. आदिवासींचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक अस्मिता आणि आधुनिक विकास यांची सांगड घालत जिल्ह्याच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा या राष्ट्रीय सोहळ्याने निर्माण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here