गडचिरोलीत १५ नोव्हेंबरला जड वाहनांना ‘नो एंट्री’; पाच मार्गांवर वाहतूक बंद

4

गडचिरोलीत १५ नोव्हेंबरला जड वाहनांना ‘नो एंट्री’; पाच मार्गांवर वाहतूक बंद
– जनजातीय गौरव दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत निर्बंध; प्रवासी बसेसना सूट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे १५ नोव्हेंबर रोजी आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवरील जड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाच प्रमुख मार्गांवर दोन्ही दिशांनी जड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. मात्र, प्रवासी बसेसना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
या सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह सुमारे आठ हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी हा आदेश जारी केला आहे.

आदेशानुसार चामोर्शी–नागपूर, धानोरा–नागपूर, आरमोरी–धानोरा–चामोर्शी, चंद्रपूर–चामोर्शी आणि धानोरा–चंद्रपूर या पाच मार्गांवरील जड वाहनांची वाहतूक निर्धारित वेळेत बंद राहणार आहे.

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित

निर्बंधांच्या कालावधीत जड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार चामोर्शी–नागपूर मार्गावरील वाहनांनी हरणघाट–चांदापूर–मूल–सिंदेवाही–नागभीडमार्गे जावे. धानोरा–नागपूर मार्गावरील वाहनांसाठी चातगाव–मुरमाडी–मौशीखांब–वडधा–पोर्ला–आरमोरी–ब्रह्मपुरी हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

आरमोरी–धानोरा ते चामोर्शी मार्गावरील वाहनांनी पोर्ला टी-पॉइंट–वडधा–मौशीखांब–चातगाव–खुटगाव–कारवाफा–पोटेगाव–घोटमार्गे चामोर्शी गाठावे. चंद्रपूर–चामोर्शी मार्गावरील वाहनांसाठी मुरखडा–मुडझा–वाकडी फाटा–शिवणी–तळोधी हा पर्यायी मार्ग असेल. तर धानोरा–चंद्रपूर मार्गावरील वाहनांनी चातगाव–खुटगाव–कारवाफा–पोटेगाव–घोट–चामोर्शी–मूलमार्गे चंद्रपूरकडे जावे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

वाहतूक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जड वाहनचालक आणि वाहतूकदारांनी निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #JanjatiyaGauravDiwas #TrafficDiversion #HeavyVehicleRestrictions #BirsaMunda #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here