– सहा लाखांचे देयक काढण्यासाठी १२ हजारांची मागणी, शिपायालाही अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि.२८ : शासकीय कामाचे देयक मंजूर करून घेण्यासाठीही लाच द्यावी लागते का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना गडचिरोली जिल्हा परिषदेत समोर आली आहे. बांधकाम विभागातील कंत्राटदाराचे सहा लाख रुपयांचे देयक काढून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहात पकडले. या प्रकरणात शिपाई ईश्वर निसार यालाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईन जिल्हा परिषद प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे एका कंत्राटदाराचे सहा लाख रुपयांचे देयक प्रलंबित होते. हे देयक काढून देण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार संबंधित कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. दरम्यान या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जिल्हा परिषद परिसरात सापळा रचला.
मंगळवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान शिपाई ईश्वर निसार याच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर कार्यकारी अभियंता बारहाते यांच्यासह निसार याच्यावर कारवाई करून दोघांनाही अटक करण्यात आली. एसीबीचे उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, राज्यात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत असतानाच ही कारवाई झाली. भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती सुरू असताना जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #acb #acbtrap













