दुष्काळाच्या झळा महिलांना अधिक; फौजिया खान यांची शासनाकडे उपाययोजनांची मागणी

4

दुष्काळाच्या झळा महिलांना अधिक; फौजिया खान यांची शासनाकडे उपाययोजनांची मागणी
– पाणीटंचाई, रोजगार, आरोग्य आणि पोषणासाठी विशेष उपाययोजनांचा आग्रह
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : दुष्काळामुळे पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी महिलांवर वाढत असून, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावरही होत आहे. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ‘दुष्काळ आणि महिलांचे प्रश्न – महिलांशी जनसंवाद!’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तथा माजी खासदार डॉ. फौजिया खान यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुष्काळग्रस्त महिलांच्या समस्यांवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजनांचा आग्रह

दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, विहिरींचे पुनर्भरण करावे आणि बोअरवेलची तपासणी करून नवीन पाणीस्रोत विकसित करावेत, अशी मागणी डॉ. खान यांनी केली. पाणी व्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक गावात महिलांच्या सहभागातून ग्रामस्तरीय पाणी व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यावरही भर देण्यात आला.

महिलांना आर्थिक मदत आणि रोजगाराच्या संधी

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना स्वतंत्र आर्थिक सहाय्य, निवृत्तिवेतन आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून द्यावीत. महिला बचत गटांना विशेष अनुदान देऊन त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करावी, तसेच कर्जावरील व्याजाचा काही भाग शासनाने भरावा, अशी मागणी करण्यात आली.
रोजगार हमीच्या कामांवर महिलांना समान वेतन आणि वेळेवर मजुरी मिळावी. कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. लहान मुलांना सांभाळणाऱ्या महिला मजुरांसाठी पाळणाघरांची व्यवस्था करावी. जलसंधारण, शेततळी, नाला खोलीकरण आणि वृक्षलागवडीच्या कामांतून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

महिला आणि बालकांच्या आरोग्याला प्राधान्य

दुष्काळग्रस्त भागांतील गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि सहा वर्षांखालील बालकांसाठी विशेष पोषण अभियान राबवावे. अंगणवाड्यांमधून सकस व पूरक आहार नियमित मिळत असल्याची खात्री करावी. रक्तक्षयग्रस्त महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी, आवश्यक उपचार आणि पोषणविषयक समुपदेशन मोहीम राबवावी, अशी मागणी डॉ. खान यांनी केली.
याशिवाय दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत, फिरती आरोग्य पथके उपलब्ध करून द्यावीत आणि मासिक पाळीच्या काळात आवश्यक स्वच्छता साधने मोफत किंवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करावीत. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
महिला जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि मागण्या जाणून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. दुष्काळग्रस्त महिलांना दिलासा देण्यासाठी शासनाने या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, असे आवाहन डॉ. फौजिया खान यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here