चंद्रपूर : दक्षता सप्ताहातच कृषी सहाय्यक ४० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
– बंधाऱ्याचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच
The गडविश्व
चंद्रपूर, दि. २७ : भ्रष्टाचाराविरोधात दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोर कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई केली. बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला रंगेहात पकडण्यात आले. हरी विठ्ठलराव उदगीरे असे आरोपीचे नाव असून, २७ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
उदगीरे हे कोरपणा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदाराने केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे आणि उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे ठरले होते.
याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या ८० नोटांच्या स्वरूपात ४० हजार रुपये स्वीकारताच पथकाने सायंकाळी ५.५५ वाजता उदगीरे यांना रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून विवो कंपनीचा मोबाईल आणि ५९५ रुपये रोख जप्त करण्यात आले. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर एसीबीचे पोलीस निरीक्षक केदार करीत आहेत. ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे आणि वर्धा एसीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #crimenews #acb













