अखेर अहेरीत रस्त्याच्या मागणीसाठीचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे

2

अखेर अहेरीत रस्त्याच्या मागणीसाठीचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे
– २२ किमी रस्त्यासह पुलांचे बांधकाम पूर्ण करण्याची ग्वाही
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. रस्त्यासह नाल्यांवरील पुलांचे बांधकाम पूर्ण केले जाईल आणि निधीची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आली.
चिरेपल्ली, पत्तीगाव, कोतागुडम आणि मरणेली ग्रामसभांच्या वतीने २१ ऑक्टोबरपासून अहेरी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांना आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पाठवले. त्यानुसार पालकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
खांदला–चिरेपल्ली–आलापल्ली हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून, त्याचे काम १०० टक्के पूर्ण केले जाईल. तसेच नाल्यांवरील पुलांचे बांधकाम दर्जेदार पद्धतीने करण्यात येईल आणि निधीची कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिली.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आता या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा परिसरातील नागरिकांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here