दिभना येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात; विद्यार्थ्यांना सापांसह वन्यजीव संवर्धनाचे धडे
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : वन्यजीव सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दिभना येथे वन्यजीव व सर्प जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच सापांविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
मानद वन्यजीव रक्षक अजय कुकडकर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, जंगलातील जैवविविधता, वन्यप्राण्यांचे संवर्धन तसेच सापांच्या विविध प्रजातींबाबत माहिती दिली. साप आढळल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे, सापाला मारू नये किंवा त्याच्याशी छेडछाड करू नये, तसेच प्रशिक्षित सर्पमित्र अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
सर्पदंश झाल्यास पारंपरिक किंवा धोकादायक उपाय न करता तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्वही यावेळी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका भारती शिवणकर, शिक्षक शामराव रामटेके, खुमेंद्र मेश्राम, निखिल बोरकर, शिक्षिका कु. सुषमा नन्नावरे तसेच सर्पमित्र अनिकेत उरकुडे, मयूर सिडाम, योगेंद्र राऊत, सतीश गेडाम, अभय पुंगाटी, सोहम मडावी, सौरभ सातपुते आणि योगेश हजारे उपस्थित होते.
शहरातील विविध भागांतही सर्प जनजागृती
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने शाळेपुरता उपक्रम मर्यादित न ठेवता विवेकानंद नगर, गोकुल नगर आणि स्टेडियमजवळील झोपडपट्टी परिसरातही सर्प जनजागृती करण्यात आली. नागरिकांना साप आढळल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर ठेवावे आणि सापांना विनाकारण मारू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वन्यजीव संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. जनजागृतीच्या माध्यमातून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून वन्यजीव आणि मानव यांच्यात सहअस्तित्वाची भावना निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.













