गडचिरोलीच्या सीमाभागात नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त; रायफल, पिस्टलसह स्फोटकांचा साठा हस्तगत
– कोपर्शी जंगलात पोलिसांची मोठी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमाभागातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षल्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. ६ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात ६ अग्निशस्त्रे, २१ जिवंत काडतुसे, ७ डेटोनेटर आणि १५० मीटर केबल वायर यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्शी जंगल परिसरात विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी प्राणहिता येथील विशेष अभियान पथकाच्या पाच तुकड्या आणि बीडीडीएसच्या दोन पथकांना रवाना करण्यात आले होते. जवानांनी जंगल परिसराला घेराव घालत कसून तपासणी केली.
या तपासणीदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला. यात एक .303 रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन गावठी पिस्टल आणि एक बीजीएल लाँचर यांचा समावेश आहे. याशिवाय १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, सात डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, दोन मॅगझिन, दोन कुकर, तीन वॉकीटॉकी, तीन वॉकीटॉकी चार्जर आणि दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या.
माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी तसेच संवेदनशील काळात शस्त्रे व स्फोटकांचा वापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अभियानादरम्यान आढळलेले इतर माओवादी साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीपणे पार पाडली. कारवाईत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.













