आरमोरीत अवैध दारूसह ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध आरमोरी पोलिसांनी कारवाई करत दारूसह चारचाकी वाहन असा ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
५ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना आरमोरीतील इंदिरानगर बर्डी परिसरातून चारचाकी वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इंदिरानगर बर्डी ते पाण्याच्या नहराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर सापळा रचला.
यावेळी संशयास्पद पांढऱ्या रंगाच्या चारचाकीला अडवून तपासणी केली असता, वाहनात रॉकेट देशी दारू संत्र्याच्या ११०० निपा, टायगर ब्रँडच्या ६०० निपा आणि रॉकेट देशी दारू बडीशेपच्या ३०० निपा आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत १ लाख ६० हजार रुपये असून, दारू वाहतुकीसाठी वापरलेली ह्युंदाई ॲक्सेंट कार (एमएच २७ बीई १०४३) किंमत ३ लाख रुपये आहे.
या प्रकरणी रुपेश रेखचंद ठवरे (वय २९, रा. आरमोरी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा दारूसाठा राहुल कैलास टेंभुर्णे (वय ४०, रा. इंदिरानगर बर्डी, आरमोरी) याचा असल्याचे सांगितले. राहुल टेंभुर्णे याचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०४६४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ), ९८ व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













