विमानतळ नको, जमीन वाचवा! राखी-गुरवळ्यात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

58

विमानतळ नको, जमीन वाचवा! राखी-गुरवळ्यात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू
– १२ मे च्या शासन आदेशाविरोधात शेतकरी संघर्ष कृती समिती आक्रमक
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : विमानतळ निर्मितीसाठी शासनाने १२ मे २०२६ रोजी जारी केलेला वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राखी-गुरवळा येथे बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आंबेडकर चौक परिसरातील पटांगणात सुरू झालेले हे आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने करण्यात येत आहे.
विमानतळासाठी प्रस्तावित जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा स्पष्ट विरोध आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वीही शासन व प्रशासनाकडे निवेदने सादर करून विविध आंदोलने केली आहेत. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाच्या निर्णयात बदल झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देत महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची बाजू गांभीर्याने ऐकून घ्यावी. १२ मे २०२६ रोजीचा विमानतळ निर्मितीसंदर्भातील वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करून या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
शासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा. अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना नेते हेमंत जंबेवार, रिपब्लिक पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्राचार्य प्रकाश दुबे, प्राध्यापक राजम बोरकर, वसंत राऊत, राजेश ठाकूर, विजय लाड, दिवाकर निसार, तात्याजी चिचघरे, परीक्षित बांबोळे, धिवरू मेश्राम, हरिजी मडावी, अनिल कोठारे, अरविंद बोदलकर, विकास जेंगठे, स्वप्निल बेहेरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, युवक-युवती, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here