अस्वलाच्या हल्ल्यात महिला जखमी; कुऱ्हाड दाखवत अस्वलाला पळवून लावले
– हाताला गंभीर दुखापत
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २८ : तालुक्यातील पन्नेमारा येथील कमलबाई शिवलाल कोरेटी या शेताकडे जात असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. २७) घडली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र, प्रसंगावधान राखत कमलबाई यांनी हातातील कुऱ्हाड दाखवून अस्वलाचा प्रतिकार केला आणि त्याला पळवून लावले.
कमलबाई शेताकडे जात असताना अचानक अस्वल त्यांच्या समोर आले. त्यावेळी घटनास्थळी आसपास कोणीही उपस्थित नव्हते. अस्वलाने हल्ला केल्यानंतरही न घाबरता कमलबाई यांनी धैर्याने त्याचा सामना केला. या झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
जखमी कमलबाई यांना तातडीने मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टर अभिलाषा आकीनवार आणि साक्षी कोकोडे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
यावेळी तुकाराम कोल्हे, मुरूमगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद गवरना, पन्नेमारा येथील पोलीस पाटील प्रभाकर हलामी आणि मुनीर शेख यांची उपस्थिती होती.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये अस्वलाच्या वावराबाबत चिंता व्यक्त होत असून, वनविभागाने परिसरात पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews #crimenews













