कसरबोडीत ‘जल जीवन’ योजनेला घरघर; ग्रामपंचायत रानवाहीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

30

कसरबोडीत ‘जल जीवन’ योजनेला घरघर; ग्रामपंचायत रानवाहीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
– तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २७ : जल जीवन मिशनअंतर्गत कसरबोडी येथे उभारण्यात आलेली सौरऊर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजना मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. योजना बंद असल्याची माहिती ग्रामपंचायत रानवाहीकडे वारंवार देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कसरबोडी येथे जल जीवन मिशनअंतर्गत सौरऊर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. योजनेच्या फलकानुसार या कामाची किंमत ७ लाख रुपये, तर झालेला खर्च ६ लाख ५२ हजार ९३९ रुपये आहे. सोलर पंप, पाण्याची टाकी आणि नळ जोडणी आदी सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मात्र, लाखो रुपये खर्चून उभारलेली ही योजना तीन महिन्यांपासून बंद असल्याने तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी इतर जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन पाण्याची गरज भागविताना नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी

योजना बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायत रानवाहीला वारंवार दिली, मात्र अद्याप पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत रानवाहीने संबंधित विभागाशी समन्वय साधून योजनेची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.
तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून बिघाडाचे कारण स्पष्ट करावे आणि पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या योजनेचा नियमित लाभ नागरिकांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here