कोरचीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; २२ कार, ६ दुचाकी अन् रोकडसह तब्बल १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त
– ३१ जण ताब्यात, ३७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, सहा फरार आरोपींचा शोध सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : आंतरराज्य सीमेलगतच्या जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस मदत केंद्र बेडगावच्या पथकाने अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी कारवाई करत ३१ जणांना ताब्यात घेतले. या धाडीत २२ चारचाकी, ६ दुचाकी, २६ मोबाईल फोन आणि ७५ हजार १० रुपये रोख असा एकूण १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री मौजा गहाणेगाळा जंगल परिसरात ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोउपनि. दिनेश खोटेले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी पोहोचून अचानक धाड टाकली.
पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पळू लागले. मात्र, पोलिसांनी प्रभावीपणे कारवाई करत ३१ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये शैलेंद्र कुमार साहू (वय २६, रा. बेलारगोंदी, ता. छुरीया, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) आणि मोहम्मद बसीर (वय ४८, रा. वार्ड क्र. १२, राजनांदगाव, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
जुगार भरविणाऱ्यांची नावे समोर
ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी छत्रपती बांगरे (रा. कोरची), अमजतखॉ पठाण, तालीब (रा. डोंगरगड), राजा ब्राँड ऊर्फ राजा श्रीवास (रा. राजनांदगाव) आणि हेमंत राजपूत (रा. राजनांदगाव) यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे या व्यक्तींची नावेही प्रकरणात समोर आली आहेत.
या घटनेप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तसेच घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींसह एकूण ३७ आरोपींविरुद्ध कोरची पोलीस ठाण्यात कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील सोनू कांबळे (रा. दुर्ग), इम्रान शेख (रा. डोंगरगाव), बबलू खाटीक (रा. भिलाई), रोहित साहू (रा. राजनांदगाव), बसंत सोनी (रा. दुर्ग) आणि अबुल वर्मा (रा. राजनांदगाव) हे सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें बेडगावच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनि. दिनेश खोटेले करीत आहेत. #thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #korchi













