सावली : तो पुन्हा आला! म्हशी चारायला गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात बळी

19

सावली : तो पुन्हा आला! म्हशी चारायला गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात बळी
– सामदा बुज परिसरात खळबळ
The गडविश्व
सावली, दि. २२ : जंगल परिसरात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सामदा बुज येथे सोमवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात हेमंत अशोक भुरसे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने सामदा बुजसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेमंत भुरसे हे सोमवारी दुपारच्या सुमारास म्हशी घेऊन जंगलाच्या दिशेने गेले होते. सायंकाळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यानंतर ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीवरून वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची वार्ता गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत

सामदा बुज परिसरात मागील काही काळापासून वाघाचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करणारे शेतकरी तसेच गुरे-म्हशी चारण्यासाठी जंगल परिसरात जाणाऱ्या पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा गंभीर झाला आहे.
दरम्यान, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून जंगलालगतच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभाग आता कोणती पावले उचलणार, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #chandrpurnews #sawali #tigerattack #tiger #forest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here