किकबॉक्सिंगमध्ये अनन्याची दमदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी निवड
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : शालेय जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूलच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. अनन्या सोमनाथ उईके हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे तिची विभागीय स्तरावरील किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे १६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत अनन्याने आपल्या कौशल्याची छाप पाडत अव्वल स्थान मिळविले. या यशामुळे शिवाजी इंग्लिश अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनन्याच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अनिल पा. मशाखेत्री, मुख्याध्यापिका शालिनी वाकुडकर, उपप्राचार्य संगीता खुणे, पर्यवेक्षक अरविंद बडी तसेच क्रीडा शिक्षक अनिकेत नैताम यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देत उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.













