माता-बाल मृत्यूंची चौकशी की एकाच अधिकाऱ्यावर कारवाई? आजाद समाज पार्टीने मागितले Clinical Audit
– डॉ. लहाडेंच्या निलंबनावरून सवाल; २.६२ कोटींच्या मानधनाचेही ऑडिट करण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : महिला व बाल रुग्णालयातील माता-बाल मृत्यूंच्या घटनांनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्या निलंबनावरून आजाद समाज पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई न करता संपूर्ण आरोग्य यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सर्व प्रकरणांचे स्वतंत्र Clinical Audit करावे, अशी मागणी पक्षाने पत्रकार परिषदेतून केली.
शासनाने १६ सप्टेंबर रोजी पर्यवेक्षकीय जबाबदारीत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डॉ. लहाडे यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्ष उपचार प्रक्रियेत सहभागी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिका पक्षाने मांडली.
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे रेफर करण्यात आलेल्या जिजा हंसराज सातर यांच्या प्रकरणाचा संदर्भ देत Fetal Heart Rate मधील बदल, उपचार प्रक्रियेतील विलंब आणि Operative Intervention का करण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, सप्टेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत IPHS/NHM अंतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञांच्या मानधनावर सुमारे २.६२ कोटी खर्च झाल्याचा दावा पक्षाने केला. C-Sectionच्या संख्येत बदल झाल्याने मानधनात सुमारे १२.२९ लाखांची घट झाल्याचेही नमूद करत या संपूर्ण व्यवहाराचे स्वतंत्र आर्थिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली.
डॉ. लहाडे यांच्यावर राजकीय दबावातून कारवाई झाल्याचा आरोपही पक्षाने केला असून, कथित राजकीय हस्तक्षेपाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.













