तुमच्या घरचा बाप्पा जगाला दाखवा! पोर्टलवर फोटो अपलोड करा; घरबसल्या घ्या दर्शन
– १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन व्यासपीठ खुले, सार्वजनिक मंडळांनाही थेट दर्शनाची सुविधा
The गडविश्व
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्रातील घराघरांतील गणरायाचे दर्शन आता जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या घेता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेले ganeshotsav.pldmka.co.in हे पोर्टल १४ सप्टेंबरपासून खुले करण्यात आले आहे. या पोर्टलवर नागरिकांना आपल्या घरातील बाप्पाच्या मूर्तीची छायाचित्रे अपलोड करून ती जगभरातील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांनाही या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या गणरायाचे थेट आणि मोफत ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मंडपात पोहोचता न येणाऱ्या भाविकांनाही घरबसल्या महाराष्ट्रातील विविध गणेशमूर्तींचे दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ला यंदा व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून आतापर्यंत ४३२ मंडळांनी स्पर्धेसाठी अर्ज केले असून ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मागील वर्षापासून स्पर्धेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे.
यंदापासून प्रथमच ही स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात येत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. राष्ट्रीय स्तरासाठी देशातील विविध शहरांतून, तर आंतरराष्ट्रीय स्तरासाठी जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया आणि सिंगापूर आदी देशांतून अर्ज प्राप्त झाले आहेत.
स्पर्धेचे परीक्षण तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांकडून प्रत्यक्ष भेटीद्वारे केले जाणार आहे. मंडळांचे वर्षभरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, सांस्कृतिक वारशाचे जतन, भाविकांसाठी सुविधा, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठीचे उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट तसेच प्रदूषणमुक्त वातावरण आदी बाबींचा विचार केला जाणार आहे. परीक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार असून जिओटॅग केलेल्या छायाचित्रांच्या आधारे निकाल नोंदविला जाणार आहे.
तालुकास्तरीय प्रथम विजेत्यास २५ हजार रुपये, जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये, तर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७.५ लाख, ५ लाख आणि २.५ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले असून, या महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये मंडळांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Ganeshotsav2026 #OnlineGaneshDarshan #MaharashtraGaneshotsav #GanpatiBappa #GaneshFestival













