गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; ‘अक्षम्य निष्काळजीपणा’चा ठपका

143

गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; ‘अक्षम्य निष्काळजीपणा’चा ठपका
– विभागीय चौकशीचे आदेश, निलंबन काळात गोंदिया राहणार मुख्यालय
The  गडविश्व 
गडचिरोली, दि. १६ : गडचिरोलीच्या आरोग्य यंत्रणेत मोठी प्रशासकीय कारवाई झाली असून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांना महाराष्ट्र शासनाने निलंबित केले आहे. पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद करत त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ  आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशाने डॉ. लहाडे यांना निलंबित करण्यात आले असून, पुढील आदेश होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे. या कारवाईमुळे गडचिरोलीच्या आरोग्य विभागात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निलंबन काळात गोंदिया मुख्यालय

निलंबनाच्या कालावधीत डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे राहणार आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच निलंबन काळात त्यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यापार-उद्योगात सहभागी होता येणार नाही. अशा प्रकारचे उल्लंघन केल्यास ते गैरवर्तन मानून नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते. निलंबनाच्या कालावधीत नियमानुसार निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार आहेत.

विभागीय चौकशीत नेमके काय समोर येणार?

शासनाच्या आदेशात डॉ. लहाडे यांच्या पर्यवेक्षकीय जबाबदारीतील ‘अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष’ याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, संबंधित आरोपांचे नेमके स्वरूप आणि त्यामागील संपूर्ण तथ्ये विभागीय चौकशीत स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे.
डॉ. लहाडे यांची गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी डिसेंबर २०२५ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही तक्रारी आणि आरोप सार्वजनिकरीत्या समोर आले होते.
शासनाच्या या निलंबन कारवाईमुळे गडचिरोलीच्या आरोग्य विभागात मोठी प्रशासकीय घडामोड घडली असून, आता विभागीय चौकशीच्या निष्कर्षाकडे आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #GadchiroliNews #Gadchiroli #HealthDepartment #MaharashtraNews #DrVarshaLahade

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here