कुरखेडा : विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे सत्कार
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १५ : समाजहितासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशन सामाजिक संस्था, गेवर्धा यांच्या वतीने शनिवारी गेवर्धा येथे सत्कार करण्यात आला. सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व्यंकटी नागीलवार होते. उद्घाटन माजी सरपंच सुषमा मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. टीकाराम बोरकर, ग्रामपंचायत सदस्य रोशनभाऊ सय्यद, संचालक व करसल्लागार श्रीकांत नागीलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू बारई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ताहीर शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीकांत नागीलवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील ही जबाबदारी त्यांच्या कार्याची व नेतृत्वावरील विश्वासाची पावती असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सहा वेळा निर्विरोध तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजूभाऊ बारई यांचाही गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ताहीर शेख यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या विविध मागण्या व समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी घेतलेल्या आग्रही भूमिकेचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन खुशाल रामटेके यांनी केले. प्रास्ताविक डॉ. जगदीश बोरकर यांनी केले, तर आभार मुकेश बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष लोकेश ठाकरे यांच्यासह अतुल अंबादे, फलिंद्र मांडवे, भूषण बोरकर, जितेंद्र वटी, मुकेश बोरकर, हेमंत बोरकर, मनीष मेश्राम, गोविंद बोरकर, रवी बाळबुद्धे, विष्णू कांबळे, पंकज मॅंड, बाळाजी नखाते, प्रिया बोरकर, येश मेश्राम, नितेश नकाते, मयूर चन्ने, धनु शेंडे, दुर्गेश मस्के, प्रशांत कावळे, गोपाल मडावी व देवा नाकतोडे यांनी परिश्रम घेतले.
समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने संकल्प फाउंडेशनकडून हा उपक्रम राबविण्यात आला.













