गडचिरोलीकरांनो जतन करा आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणी ; ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर मोफत नोंदणी

57

गडचिरोलीकरांनो जतन करा आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणी ; ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर मोफत नोंदणी
– गणेशोत्सवाच्या कौटुंबिक परंपरा, कथा व छायाचित्रांचे होणार डिजिटल दस्तऐवजीकरण; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : महाराष्ट्राच्या घराघरांत पिढ्यान्‌पिढ्या जपल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी, कौटुंबिक कथा आणि छायाचित्रे आता डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा उपक्रम राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (www.bappa.org) या उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या घरच्या गणेशोत्सवाची माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील कुटुंबे, मंदिरे, सार्वजनिक गणेश मंडळे तसेच विविध समुदायांच्या गणेशोत्सवाशी निगडित परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जपल्या जाणाऱ्या अनोख्या प्रथा, श्रद्धा आणि गणेशोत्सवाच्या आठवणी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला प्रमाणपत्र

गणेशोत्सवाची माहिती यशस्वीरीत्या सादर करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या नावाने अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर #घरोघरीबाप्पा आणि #GharoGhariBappa या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी पूर्णपणे मोफत

या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नागरिकांना +91 91361 72681 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून किंवा Bappa.org संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे. तसेच Facebook, Instagram आणि YouTube वरील @BappaOrg या सोशल मीडिया हँडलवर उपक्रमाची माहिती उपलब्ध आहे.

नोंदणीची प्रगती जिल्हानिहाय राज्यस्तरीय डॅशबोर्डवर नोंदविण्यात येणार आहे. गडचिरोलीतील अधिकाधिक कुटुंबांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी आणि छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here