एसटीची ‘घरघर’ थांबेना! मौशीखांबजवळ बस पुन्हा बंद, प्रवाशांची तारांबळ
– गडचिरोली आगाराच्या जुन्या बसांमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचा प्रवाशांचा आरोप
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ९ : गडचिरोली आगाराची MH 40 AQ 6038 क्रमांकाची एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे मौशीखांब टी-पॉइंटजवळ बंद पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गडचिरोली-आंबेशिवनी-अमिर्झा-मौशीखांब मार्गे बेलगाव येथे गेलेली ही बस परतीच्या प्रवासात बेलगाव-चातगाव मार्गावर बंद पडली.
बसच्या यांत्रिक भागात बिघाड झाल्याने मौशीखांब टी-पॉइंटवर बस ठप्प झाली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. त्याचबरोबर या मार्गावर बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांचाही खोळंबा झाला.
या मार्गावर जुन्या व जीर्ण अवस्थेतील बस धावत असल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात याच बसचे बेलगाव येथे टायर पंक्चर झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा बस बंद पडल्याने एसटीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी एसटी बस ही प्रवासाचे प्रमुख साधन आहे. मात्र, बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे नियोजन विस्कळीत होत आहे. वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने नागरिकांना अतिरिक्त वेळ व खर्चाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, या मार्गावरील बससेवेचा आढावा घेऊन सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्यावी तसेच वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.













