चामोर्शी : तरुणाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
– वाघोली शिवारातील घटना; के मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
The गडविश्व
गडचिरोली, दि.०८ : चामोर्शी-मूल मार्गालगत वाघोली शिवारात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सोमवारी रात्री एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसल्याने या हत्येचा उलगडा करण्याचे आव्हान चामोर्शी पोलिसांसमोर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृत तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, मृताची ओळख पटविण्याला प्राधान्य दिले जात आहे.
मृताच्या अंगावरील वस्तूंवरून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंदाजे साडेपाच फूट उंची, गोरा रंग आणि सडपातळ शरीरयष्टी असलेल्या या तरुणाने काळा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट घातली होती. त्याच्या गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ आणि पायात प्लास्टिकच्या चप्पल होत्या. या वर्णनावरून आपल्या परिचित व्यक्तीबाबत संशय किंवा माहिती असल्यास नागरिकांनी चामोर्शी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळाचा बारकाईने तपास करण्यात येत आहे. हत्येपूर्वी तरुण कुठे होता आणि त्याच्यासोबत कोणी होते, यासह त्याच्या वाघोली शिवारातील उपस्थितीचे कारण तपासले जात आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्ती आणि संभाव्य हालचालींची माहितीही पोलिसांकडून संकलित केली जात आहे.
हत्येचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळावरून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मृताची ओळख पटते का आणि या रक्तरंजित घटनेमागील नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chamorshi #crimenews #murder













