गडचिरोलीच्या दुर्गम भागातील बालकांसाठी ४५ पाळणाघरे; पैमा येथे पहिल्या केंद्राचा शुभारंभ

13

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील बालकांसाठी ४५ पाळणाघरे; पैमा येथे पहिल्या केंद्राचा शुभारंभ
– पोषण, आरोग्य व सुरक्षित संगोपनाची सुविधा गावपातळीवर; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०८ : दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना पोषण, आरोग्य, सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ४५ समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत ‘बाल पोषण व विकास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने ‘मोबाईल क्रेचेस फॉर वर्किंग मदर्स चिल्ड्रेन’ संस्थेमार्फत एटापल्ली तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे.
पोषण माहाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या पाळणाघरांमध्ये बालकांना सुरक्षित वातावरण, पोषक व वैविध्यपूर्ण आहार, आरोग्य व स्वच्छतेची काळजी तसेच वयानुरूप प्रारंभिक विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मातांना रोजगार, उपजीविका आणि इतर जबाबदाऱ्यांसाठी आवश्यक वेळ देता येणार आहे.
गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम जिल्ह्यात अनेक गावे वनबहुल आणि मुख्य सुविधांपासून दूर आहेत. एटापल्ली तालुक्यात १९७ हून अधिक गावे असून, त्यातील अनेक गावांमध्ये अत्यावश्यक सेवा पोहोचविताना भौगोलिक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर समुदायाच्या पातळीवर बालसंगोपन व पोषणाची सुविधा उपलब्ध होणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“भौगोलिक दुर्गमतेमुळे कोणतेही बालक आरोग्यसेवा, पुरेसे व वैविध्यपूर्ण पोषण तसेच सुरक्षित संगोपनापासून वंचित राहू नये. या भागीदारीतून बालकांच्या सुदृढ भविष्यासाठी मजबूत पाया निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले.
टाटा ट्रस्ट्सच्या न्यूट्रिशन विभागाच्या प्रमुख जयीता चौधरी यांनी बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस शारीरिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पाळणाघरांतील बालकांना अंगणवाडी व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच गरज भासल्यास वेळेत वैद्यकीय सेवेसाठी संदर्भित करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोबाईल क्रेचेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा मिश्रा यांनीही दुर्गम भागातील बालकांपर्यंत दर्जेदार पोषण व प्रारंभिक बालसंगोपनाच्या सुविधा पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

बुर्गीतील डीएमएफ कामांची पाहणी

क्षेत्रीय दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी बुर्गी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

तोडसा आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी संवाद

तोडसा येथील शासकीय आश्रमशाळेतील नवीन इमारतीच्या बांधकामाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून शिक्षण आणि शाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत माहिती घेतली. त्यानंतर तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्यसेवा व उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.

नागुलवाही रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी

दौऱ्यात नागुलवाही येथील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासली. रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पैमा येथे सुरू झालेले केंद्र हे या उपक्रमातील पहिले समुदायाधारित पाळणाघर असून, नियोजित ४५ पाळणाघरे येत्या काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमर राऊत, उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके, टाटा ट्रस्ट्सच्या जयीता चौधरी, निलेश यादव, तहसीलदार हेमंत गांगुर्डे तसेच महिला व बालविकास, महसूल, आरोग्य आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here