खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम गडचिरोलीच्या रस्त्यांसाठी ५७.१८ कोटी मंजूर

17

खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम गडचिरोलीच्या रस्त्यांसाठी ५७.१८ कोटी मंजूर
– ४७.२४ किमी रस्त्यांची निर्मिती; भामरागड, धानोरा, एटापल्लीतल्या गावांना मिळणार पक्की जोडणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जिल्ह्यातील अतिदुर्गम व विकासापासून वंचित भागातील रस्त्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-४ अंतर्गत ५७.१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ४७.२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आदिवासीबहुल व दुर्गम गावांना अद्यापही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. अपुऱ्या दळणवळणामुळे नागरिकांना शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच शासकीय सेवांपर्यंत पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंजूर झालेला निधी दुर्गम भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
भामरागड, धानोरा, एटापल्लीसह जिल्ह्यातील इतर दुर्गम भागातील गावांना या रस्त्यांमुळे तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडणी मिळणार आहे. रस्ते उपलब्ध झाल्यानंतर शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास, रुग्णांना आरोग्यसेवा मिळविणे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी सांगितले की, गडचिरोलीतील दुर्गम आणि विकासापासून वंचित भागांना दर्जेदार रस्त्यांनी जोडणे ही आपली प्राथमिकता आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-४ अंतर्गत ५७.१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आगामी काळातही रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही खासदार किरसान यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here