गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘व्हिजन २०४७’
– तज्ज्ञ, उद्योजक, महिला व युवकांच्या सूचनांचा विकास आराखड्यात समावेश : डॉ. देवराव होळी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : वनसंपदा, बांबू, कृषी उत्पादन, वनौषधी, पर्यटन आणि मानवी संसाधनांची मुबलक क्षमता असलेल्या गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, महिला, युवक तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार आणि उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी यांनी दिली.
सर्किट हाऊस येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. होळी यांनी या व्हिजनची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरविताना विविध क्षेत्रांतील जाणकारांचा सहभाग घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
१६ व १७ ऑगस्ट रोजी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती-सिंचन, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवक-क्रीडा, वनाधारित अर्थव्यवस्था, ग्रामविकास, PESA, वनहक्क आणि आदिवासी विकास अशा विविध विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. जिल्ह्याच्या गरजा, उपलब्ध संसाधने आणि विकासाच्या संधी लक्षात घेऊन आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले.
२६ ऑगस्ट रोजी जिल्हा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ‘व्हिजन २०४७’चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारणी, प्रक्रिया व मूल्यवर्धनाला चालना आणि त्यातून रोजगारनिर्मिती करण्यावर या व्हिजनमध्ये विशेष भर देण्यात आला आहे. गडचिरोलीतील नैसर्गिक व मानवी संपत्तीचे योग्य नियोजन केल्यास जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असा विश्वास डॉ. होळी यांनी व्यक्त केला.
‘व्हिजन २०४७’ हा केवळ विकासाचा दस्तऐवज नसून सामूहिक सहभागातून साकारलेला गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विकाससंकल्प आहे, असे डॉ. होळी यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, अमोल कुळमेथे, विलास देशमुखे, पुष्पलता कुमरे, विद्या दुग्गा, आरती कोल्हे, उमेश उईके, सूरज मडावी, काशिनाथ देवघडे, योगेश कुमरे आदी उपस्थित होते.













