देसाईगंज नाट्यछटा स्पर्धेत कोंढाळा पीएम श्री शाळेची बाजी; सातवीच्या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक
– पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कोंढाळा शाळेची निवड
The गडविश्व
ता.प्र /देसाईगंज, दि. ०३ : प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश देत पिएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोंढाळा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. पंचायत समिती, देसाईगंज येथे आयोजित या स्पर्धेत विद्यार्थिनीच्या दमदार अभिनयाने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. या यशामुळे कोंढाळा पीएम श्री शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
‘प्लास्टिक राक्षस’ अन् ‘समुद्रातील मासे’ ठरले प्रभावी
‘पर्यावरणबचाव’ या विषयावर आधारित नाट्यछटेत ‘प्लास्टिक राक्षस’ आणि ‘समुद्रातील मासे’ ही पात्रे प्रभावीपणे साकारण्यात आली. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलचर आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम विद्यार्थिनीने आपल्या अभिनयातून अत्यंत मार्मिकपणे मांडले. पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणाऱ्या या सादरीकरणाला परीक्षकांची विशेष दाद मिळाली.
इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या तालुकास्तरीय स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला होता. मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला.
या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका शर्मिला झीलपे यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीने नाट्यछटेची प्रभावी तयारी केली. विषयाची मांडणी, अभिनय आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांची प्रभावी सांगड घालत कोंढाळा पीएम श्री शाळेने तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.
आता विजेती विद्यार्थिनी जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेत देसाईगंज तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समितीचे पदाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच कोंढाळा ग्रामस्थांनी विजेत्या विद्यार्थिनीचे आणि मार्गदर्शक शिक्षिका शर्मिला झीलपे यांचे अभिनंदन केले.













