अवैध दारूविरोधात गडचिरोली पोलिसांचा धडाका ; ५.४० लाखांचा मोहफुलाचा सडवा नष्ट
– येलचिल पोलिसांची चार ठिकाणी धाड; चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
The गडविश्व
अहेरी, दि.२१ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. येलचिल पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत मौजा नवेगाव व वेलगुर टोला येथील शेतशिवारात चार ठिकाणी धाड टाकून ५ हजार ४०० लिटर मोहफुलाचा सडवा आणि हातभट्टी साहित्य असा सुमारे ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोमकें येलचिल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २० ऑगस्ट रोजी पोलिस पथकाने नवेगाव व वेलगुर टोला परिसरातील शेतशिवारात कारवाई केली. यावेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मोहफुलाच्या हातभट्टी दारूची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान एका ठिकाणी ८ निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये ८०० लिटर, दुसऱ्या ठिकाणी १० ड्रममध्ये १ हजार लिटर, तिसऱ्या ठिकाणी १० ड्रममध्ये २ हजार लिटर, तर चौथ्या ठिकाणी १६ ड्रममध्ये १ हजार ६०० लिटर असा एकूण ५ हजार ४०० लिटर मोहफुलाचा सडवा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष हातभट्टी साहित्य, तयार दारू व ड्रममधील सडवा नियमानुसार घटनास्थळीच नष्ट केला.
या प्रकरणी मारोती लक्ष्मण मोहुर्ले (३५), शंकर नागोराव सोनूले (३८), शंकर बिच्चु आत्राम (२४), तिरुपती कनकय्या दुलम (४०) यांच्याविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास व कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलिस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. व उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोमकें येलचिलचे प्रभारी अधिकारी धनाजी शिंदे, अशोक बांगर यांच्यासह पोलिस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.













