महिला सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिसांचा पुढाकार; महिला दक्षता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर मंथन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, लैंगिक अत्याचार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच ‘ड्रग फ्री कॅम्पस’ या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने महिलांच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस अधिकारी व अंमलदारांसह सामाजिक कार्यकर्त्या, महिला वकील, डॉक्टर आणि शिक्षिकांचा समावेश आहे. बैठकीत महिलांच्या दैनंदिन अडचणी, सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न, कायदेशीर हक्क, सामाजिक समस्या तसेच शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत उपलब्ध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी छेडछाड व लैंगिक अत्याचाराविरोधातील कायदेशीर तरतुदी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘ड्रग फ्री कॅम्पस’ संकल्पनेच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. समितीतील महिला सदस्यांकडूनही विविध विषयांवर सूचना व सल्ले घेण्यात आले.
“घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणार”
बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गडचिरोली पोलीस दलाचा विशेष भर राहणार आहे. महिलांनी अन्याय व अत्याचाराला बळी न पडता आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. महिलांना आपल्या समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात आणि अडचणीच्या प्रसंगी तात्काळ पोलीस मदत मिळावी, यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या क्रमांकाच्या माध्यमातून महिला, बालकांसह सर्व नागरिकांना मदत उपलब्ध करून दिली जाते. महिला सुरक्षेसाठी केवळ पोलीस दल नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून सक्रिय सहभाग घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबनाला प्राधान्य देत महिला सक्षमीकरणासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या आयोजनासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.













