खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार नवे मैदान; गडचिरोली क्रीडा संकुलासाठी ८० कोटी मंजूर

18

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार नवे मैदान; गडचिरोली क्रीडा संकुलासाठी ८० कोटी मंजूर
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेतील मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गडचिरोली शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे प्रस्तावित क्रीडा सुविधांच्या कामांसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, प्रेक्षक गॅलरी, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी व खो-खो मैदान तसेच पार्किंग क्षेत्र आणि विविध अंतर्गत विकास कामे विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या सुविधांमुळे विविध क्रीडा प्रकारांच्या सराव व प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलातील यापूर्वीच्या कामांसाठी ४४ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी २३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित विविध क्रीडा सुविधांसाठी ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
मंजूर करण्यात आलेल्या सुविधा गडचिरोली शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातच उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली. विशेषतः ॲथलेटिक ट्रॅक, कबड्डी व खो-खो मैदान आणि खेळाडूंसाठी वसतिगृहाचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्रीडा सुविधा विकसित झाल्यानंतर जिल्ह्यातील खेळाडूंना नियमित सराव व प्रशिक्षणासाठी आवश्यक मैदाने आणि निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच विविध स्तरांवरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही जिल्हा क्रीडा संकुलात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here