केदारनाथचा १,८४३ किमी सायकल प्रवास करणाऱ्या निलेशला ‘सायकल स्नेही मंडळा’कडून सायकल भेट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गडचिरोली ते केदारनाथ धाम असा तब्बल १ हजार ८४३ किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करणाऱ्या निलेश विलास गुरुनुले या युवकाच्या जिद्दीला ‘सायकल स्नेही मंडळा’ने मदतीचा हात दिला आहे. मंडळाच्या वतीने निलेशला १० हजार रुपये किमतीची नवीन सायकल भेट देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
गडचिरोली शहरातील गरीब कुटुंबातील निलेश वृत्तपत्र वाटप करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावतो. सायकलची आवड आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द या बळावर त्याने गडचिरोली ते केदारनाथ धामचा खडतर प्रवास सायकलवरून पूर्ण केला.
या प्रवासादरम्यान निलेशची सायकल खराब झाली. त्यामुळे प्रवासासोबतच दैनंदिन वृत्तपत्र वितरणाचे कामही प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. निलेशची जिद्द आणि त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांनी त्याला नवीन सायकल देण्याचा निर्णय घेतला.
आजही मंडळाने भेट दिलेल्या याच सायकलवरून निलेश नियमित वृत्तपत्र वाटप करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या त्याच पायांनी आता कुटुंबासाठी श्रमाची वाटचाल सुरू ठेवली आहे. मंडळाच्या या मदतीमुळे निलेशच्या दैनंदिन जीवनाला मोठा आधार मिळाला आहे.
“ही सायकल केवळ एक वस्तू नसून निलेशच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आणि त्याच्या भविष्यातील प्रवासाची नवी दिशा आहे,” अशी भावना मंडळाचे जिल्हा सरचिटणीस उदय धकाते यांनी व्यक्त केली.
निलेशच्या जिद्दीला मिळालेली ही साथ म्हणजे सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. सायकल स्नेही मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य, सायकलप्रेमी आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शक्य झाल्याचे धकाते यांनी सांगितले.
यापुढेही “आरोग्यासाठी सायकल, पर्यावरणासाठी सायकल आणि समाजासाठी सायकल” या उद्देशाने सायकलचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प मंडळाने व्यक्त केला. अधिकाधिक नागरिकांनी सायकलचा वापर करून आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.













