गडचिरोली पोलिसांचा पराक्रम देशभरात गौरवला ; २० अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक
– एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : माओवाद्यांविरोधातील धाडसी कारवाया आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील २० अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपतींचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. तसेच एका अधिकाऱ्याला ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी या पदकांची घोषणा करण्यात आली.
देशभरात यंदा एकूण २७२ पोलीस शौर्य पदके आणि ६०६ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके जाहीर झाली आहेत. गडचिरोली पोलीस दलाला २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण ३१ पोलीस शौर्य पदके मिळाली आहेत. मागील पाच वर्षांत दलाच्या शिरपेचात ३ शौर्य चक्र, २३७ पोलीस शौर्य पदके आणि ७ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके जमा झाली आहेत.
चकमकीतील पराक्रमाची दखल
सन २०२३ मध्ये भामरागड तालुक्यातील केडमारा आणि २०२४ मध्ये कंत्रनगट्टा येथे झालेल्या पोलीस-माओवादी चकमकीत गडचिरोली पोलिसांनी ६ माओवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवायांमध्ये धाडसी आणि यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी-अंमलदारांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले.
शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये यतिश विजयराव देशमुख (तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक, अभियान, गडचिरोली), सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पांडुरंग गवळी, वासुदेव राजम मडावी यांच्यासह पोलीस हवालदार दिलीप विठ्ठल आत्राम, मासा बोरा आत्राम, विजय किष्टय्या कोडापे, दशरथ रामशहा मडावी, अजय गोपालराव मडावी, गणेश चंद्रम डुब्बुला, विजय झुरू मडावी, भुपेश मारोतराव जुमनाके, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोरतेट, श्रीनिवास समय्या निष्ठुरी, गणेश हनमंतू गंजीवार, नितेश प्रभुदास टेंभेकर, शिवाजी मेस्सो हिचामी, संजय मल्लेश कंकाबंडावार, राजेश शामराव किरंगे आणि दलसु कटिया बोगामी यांचा समावेश आहे.
३० जणांना सेवापदक
यासोबतच २५ वर्षांपेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावलेल्या २७ अधिकारी-अंमलदारांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’, तर १५ वर्षांपेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावलेल्या ३ अधिकारी-अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
या सर्व पदकप्राप्त अधिकारी-अंमलदारांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliPolice #Gadchiroli #PoliceBravery #PoliceMedal #PresidentPoliceMedal #PoliceGallantryMedal #MaharashtraPolice #GadchiroliNews #MaharashtraNews #IndependenceDay #PoliceBraveryAward #AntiNaxalOperations #NaxalOperation #IndianPolice #PoliceAwards













