प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतिम प्रतीक्षा यादीसाठी उद्या ग्रामसभा
– गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजन; मसुदा यादीची होणार पडताळणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत Awaas+ 2024 सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मसुदा प्रतीक्षा यादी सादर करून लाभार्थ्यांची पात्रता आणि नोंदविण्यात आलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
AwaasSoft प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेली मसुदा कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभेसमोर ठेवण्यात येईल. यादीतील लाभार्थी, त्यांची पात्रता तसेच नोंदविलेल्या माहितीची वस्तुस्थिती उपस्थित नागरिक व संबंधित लाभार्थ्यांच्या समक्ष तपासली जाणार आहे.
यादीमध्ये नाव, पात्रता किंवा इतर माहितीबाबत त्रुटी, बदल अथवा दुरुस आवश्यक असल्यास नागरिकांना ती ग्रामसभेत निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. प्राप्त हरकती व दुरुस्त्यांची ग्रामसभेच्या कार्यवाहीत नोंद केली जाणार आहे.
ग्रामसभेतील संपूर्ण कार्यवाही AwaasSoft प्रणालीवर नोंदविण्यात येणार असून, संबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी व अधिकृत शिक्क्यासह कार्यवाहीचा नमुना प्रणालीवर अपलोड केला जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार अंतिम कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी निश्चित करण्यात येईल.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली मसुदा यादी नागरिकांनी काळजीपूर्वक तपासावी. यादीमध्ये कोणतीही तथ्यात्मक त्रुटी किंवा दुरुस्ती आढळल्यास ती १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मांडावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र लाभार्थ्यांची अचूक आणि पारदर्शक यादी निश्चित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
Awaas+ 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याच्या या प्रक्रियेत सर्व संबंधित नागरिकांनी ग्रामसभेला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर यांनी केले आहे.













