रस्ते अपघातात पोलीस पाटील विनोद तुलावी यांचा मृत्यू ; कुटुंबीयांना प्रशासन व संघटनेची आर्थिक मदत

58

रस्ते अपघातात पोलीस पाटील विनोद तुलावी यांचा मृत्यू ; कुटुंबीयांना प्रशासन व संघटनेची आर्थिक मदत
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १२ : मुरमाडी येथील पोलीस पाटील विनोद शंकर तुलावी यांचे १० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास रस्ते अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने मुरमाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
११ ऑगस्ट रोजी झालेल्या अंत्यविधीस कुरखेड्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार आंबेकर, प्रभारी अधिकारी API राजू गवळी, प्रभारी अधिकारी आकाश नायकवाडी, अमलदार चंद्रभान साहरे यांच्यासह महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी दिवंगत विनोद तुलावी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दुःखाच्या या प्रसंगी अधिकारी आणि महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या हस्ते ही मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
प्रशासनातील अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटना, मालेवाडा यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. दिवंगत विनोद तुलावी यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here