जपतलाई सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी संघटना आक्रमक ; आश्रमशाळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

37

जपतलाई सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी संघटना आक्रमक ; आश्रमशाळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आदिवासी संघटनांनी प्रशासनाकडे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि अखिल भारतीय SC/ST विकास परिषद, गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वाजिद शेख यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासह आश्रमशाळांमध्ये ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.
जपतलाई येथील दुर्घटना अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने पावले उचलण्याची मागणी केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शासकीय तसेच खासगी आश्रमशाळांची नियमित तपासणी करून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
भेटीदरम्यान आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवरही सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, निवास, भोजन, पिण्याचे पाणी, वीज तसेच शाळा परिसरातील सुरक्षाव्यवस्था यांचा आढावा नियमितपणे घेण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने प्रभावी देखरेख व्यवस्था निर्माण करावी, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, आश्रमशाळांमधील सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये. जपतलाई घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली.
यावेळी SC/ST विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, डॉ. तारा वलके, सर्पमित्र अजय कुकडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here