‘हक्क आणि अस्तित्वाची लढाई आपल्यालाच लढावी लागेल’
– ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा ‘चरखे के पास चर्चा’मध्ये नागरिकांना एल्गार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर थेट संवाद घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन केले.
“स्वतःच्या हक्काचे आणि अस्तित्वाचे रक्षण करण्याची लढाई दुसरा कोणी येऊन लढणार नाही; ती आपल्यालाच लढावी लागेल. आपल्या प्रश्नांसाठी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन अशोक वानखेडे यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या विचारांचा संदर्भ देत वानखेडे म्हणाले की, अन्यायाविरोधातील लढाई अहिंसक आणि लोकशाही मार्गानेच लढली पाहिजे. संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार केवळ मागणी केल्याने मिळतीलच असे नाही, तर त्या अधिकारांबाबत जागरूक राहून त्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागतो.
गडचिरोलीच्या विकासाच्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. “आज सरकार कोण चालवत आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांनी विचारण्याची वेळ आली आहे. अदानी-अंबानींसारख्या मोठ्या उद्योगसमूहांचा सरकारच्या धोरणांवर किती प्रभाव आहे, याचाही विचार झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
“गडचिरोलीचा विकास कसा आणि कोणत्या दिशेने करायचा, याचा निर्णय येथील जनतेने घेतला पाहिजे. मात्र जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कंपन्यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी आणि आदिवासींच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्ह्याला दोन पालकमंत्री असतानाही नागरिकांचे मूलभूत प्रश्न कायम असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केवळ पदे, घोषणा आणि आश्वासनांपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय आणि ठोस कृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीची सुपीक शेतजमीन, जंगल, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्थानिक नागरिकांचे हक्क यांचे संरक्षण करताना विकासाचा समतोल साधला पाहिजे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचे अस्तित्व, उपजीविका आणि हक्क धोक्यात येता कामा नये, असेही वानखेडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी संदेश सिंगलकर, महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोर पाटील पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, दिवाकर निसार, प्रमोद भगत, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, माधव गावड, राजेंद्र बुल्ले, अनिल कोठारे, रवींद्र पाल, विजय लाड, विलास चीचघरे, उत्तम ठाकरे, रोडे महाराज, ढिवरू मेश्राम, डॉ. शीतल ठवरे, विमल भोयर, भारत येरमे, सुशील शहा, विकास जेंगठे, राहुल वैरागडे, नदीम नाथानी, गौरव येनप्रेड्डीवार, देवानंद कुमरे, लीलाधर गुरनुले, कालिदास पेंदाम, गुरुदास ठाकरे, वनिता बाबनवाडे, रेखाताई जेंगठे, शालिना निसार, सोनी कांबळे, आशा पेंदाम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
‘चरखे के पास चर्चा’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर खुलेपणाने संवाद साधला जात असून नागरिकांनीही आपल्या समस्या, मागण्या आणि भूमिका मांडण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.













