शेतकऱ्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केल्यास ‘जेल भरो’ ; महेंद्र ब्राह्मणवाडेंचा इशारा
– मुधोली (चक क्र. २) येथील शेतकऱ्यांचा वरद फेरो प्रकल्पाला विरोध
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : सुपीक शेतजमिनी वाचवण्यासाठी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या शेतकऱ्यांवर चुकीचे किंवा अन्यायकारक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
चामोर्शी तालुक्यातील मुधोली (चक क्र. २) परिसरातील शेतकऱ्यांनी वरद फेरो कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शविला असून, आपल्या सुपीक शेतजमिनी प्रकल्पासाठी देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतजमीन हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. जमीन गेल्यास शेतीवर अवलंबून असलेला रोजगार तसेच कुटुंबाचा आर्थिक आधार धोक्यात येईल. त्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी व हक्कांसाठी लोकशाही मार्गाने विरोध नोंदवत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा आवाज दडपण्यासाठी दबावाचे तंत्र वापरणे किंवा चुकीचे गुन्हे दाखल करणे योग्य नसल्याचे ब्राह्मणवाडे यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करू नये तसेच आंदोलन दडपण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दबावतंत्र वापरू नये, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.













