मरणयातना कायम! मालेवाडा–जयसिंगटोला स्मशानभूमी रस्ता धोकादायक
– नदीकाठचा मार्ग खचला, ग्रामस्थांचा संताप
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १७ : मालेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील मालेवाडा–जयसिंगटोला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, नदीकाठचा सिमेंटचा स्लॅब खचल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून अंत्ययात्रा काढावी लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता नदीच्या अगदी काठाने जातो. नदीच्या प्रवाहामुळे रस्त्याखालची माती वाहून गेल्याने सिमेंटचा स्लॅब खचला असून त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या कडाही ढासळल्या असून मुख्य डांबरी रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा मार्ग कधीही नदीत कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या धोकादायक आणि अरुंद झालेल्या मार्गावरून अंत्ययात्रा नेणे तसेच वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि वाढलेल्या नदीपात्रामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुःखाच्या प्रसंगीही सुरक्षित रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा परिसर मालेवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असूनही खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती, संरक्षक भिंत उभारणे किंवा तात्पुरत्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांनी मालेवाडा ग्रामपंचायत व संबंधित विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नदीकाठच्या खचलेल्या स्मशानभूमी रस्त्याची दुरुस्ती करावी, संरक्षण भिंत उभारावी आणि नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.













