बालआरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी; कुरखेडा RBSK पथकाचा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते गौरव
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १७ : उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पथकाने दुर्गम व आदिवासी भागातील बालकांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देत हृदयरोगासह विविध जन्मजात विकारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मागील वर्षभरात RBSK पथकाने हृदयरोग, जन्मजात विकृती तसेच इतर शस्त्रक्रियांसाठी पात्र बालकांची तपासणी, निदान, संदर्भ सेवा व उपचार यशस्वीपणे राबविले. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग निदान शिबिरात मोठ्या संख्येने बालकांची 2-डी इको तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच सन 2025-26 मध्ये कुरखेडा तालुक्यातील पाच हृदयरोगग्रस्त बालकांवर मोफत शस्त्रक्रिया, तर हायड्रोसिल, हर्निया, अंडिसेंडेंट टेस्टिस, हायपोस्पेडियास, अपेंडिक्स आदी आजारांवरील 50 मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या गौरव सोहळ्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके व डीईआयसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, डॉ. अर्चना गऱ्हाटे, डॉ. प्राजक्ता दुपारे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. स्नेहा कृपाल आणि डॉ. अंकित बोरसरे यांचा सन्मान करण्यात आला.
या पथकाने जन्मजात हृदयरोग, ओठ-टाळू विदीर्ण, मोतीबिंदू, हर्निया आदी आजारांनी बाधित बालकांना उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये वेळेत संदर्भित करून यशस्वी उपचार मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
यावेळी डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा बालकांच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक पात्र बालकापर्यंत सेवा पोहोचवून वेळेत उपचार उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी असून, सर्वांनी यापुढेही याच समर्पणाने कार्य सुरू ठेवावे.”
सन्मानित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा गौरव संपूर्ण आरोग्य विभागाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगत, भविष्यातही बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या गौरवामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत औषध निर्माण अधिकारी विनोद दुपारे, हेमंत बोरकर, धम्मप्रिय झाडे तसेच परिचारिका टिकेश्वरी करमकार, वर्षा दुमाने आणि इतर कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, गुणवत्तापूर्ण बालआरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.













