पावसाच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय महामार्गाला तलावाचे स्वरूप ; धानोरा–करेमरका मार्गावर जीवघेणे खड्डे
– महामार्गाची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, अपघाताचा धोका वाढला
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १६ : धानोरा–मुरूम राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा ते करेमरका दरम्यानचा रस्ता पावसाच्या सुरुवातीलाच अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने महामार्गाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले असून वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा बनला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शिक्षणासाठी धानोरा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या शिक्षणात सातत्याने खंड पडत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरून दररोज शेकडो अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस अधिक खोल आणि धोकादायक बनत आहेत. पावसामुळे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धानोरा–ढवळी या सुमारे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नसल्याने संपूर्ण मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याचे अक्षरशः कंबरडे मोडले असून दररोज ट्रक चिखलात अडकण्याच्या घटना घडत आहेत. चारचाकी वाहनांना हा मार्ग पार करणे तारेवरची कसरत ठरत असून अनेक वाहनचालक हा मार्ग टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
महामंडळाच्या बससेवेवरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा परिणाम झाला आहे. बस मुरूमपर्यंत नियमित पोहोचेल की नाही, याची खात्री नसल्याने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी धानोरा येथे शिक्षणासाठी वेळेवर पोहोचू शकत नाहीत. परिणामी त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
ही समस्या अनेक दिवसांपासून कायम असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीस सुरक्षित बनवावे, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक व विद्यार्थी उपस्थित करत आहेत.













