कुरखेडा : कपडे वाळविताना विजेचा धक्का, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

137

कुरखेडा : कपडे वाळविताना विजेचा धक्का, महिलेचा दुर्दैवी मृत्यू
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ५ : तालुक्यातील गुरनोली ग्रामपंचायत अंतर्गत टेकडीटोला येथे कपडे वाळविताना विजेचा धक्का लागून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ५) दुपारी सुमारे २ वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत महिलेचे नाव प्रभा दिनकर मडकाम (वय ४५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभा मडकाम या नेहमीप्रमाणे कपडे धुऊन घराशेजारी असलेल्या सार्वजनिक वीज खांबाच्या अर्थिंगसाठी बांधलेल्या तारावर कपडे वाळवत होत्या. त्याचवेळी त्या तारेला विद्युत प्रवाह आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की त्या जागीच गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना चारचाकी वाहनातून उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे मडकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रभा मडकाम यांच्या पश्चात पती व एक मुलगा असा परिवार असून, कुटुंबातील एकमेव महिला सदस्याच्या निधनाने कुटुंब उघड्यावर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच भाजप तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here