कुरखेडा : नाल्याच्या पुलावर ट्रॅक्टरचा भीषण अपघात, इंजिन पुलाखाली कोसळले, ट्रॉली पुलावरच…
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०५ : शहरातील वडसा मार्गावरील विद्यानगर परिसरातनाल्याच्या पुलावर आज (०५) सिमेंट रस्त्याच्या कामासाठी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात भीषण अपघात झाला.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रॅक्टरचे इंजिन पुलाखाली कोसळले, तर सिमेंटचे खांब भरलेली ट्रॉली पुलाच्या कडेला धोकादायक स्थितीत लटकून राहिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली असून चालक उमेश कोरिटी (रा. चरविदंड) हे सुदैवाने बचावल्याची माहिती मिळाली.
प्राथमिक माहितीनुसार, उमेश कोरिटी हे सिमेंट रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य सावंगी येथे पोहोचविण्यासाठी ट्रॅक्टरने जात होते. दरम्यान, कुरखेड्यातील विद्यानगरजवळ ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सिमेंटचे खांब असल्याने अपघाताचे गांभीर्य अधिक वाढले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident













