हृदयविकारग्रस्त बालकांसाठी दिलासादायक उपक्रम; उद्या गडचिरोलीत मोफत 2D Echo शिबिर

45

हृदयविकारग्रस्त बालकांसाठी दिलासादायक उपक्रम ; उद्या गडचिरोलीत मोफत 2D Echo शिबिर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या बालकांचे वेळेत निदान व्हावे आणि गरजू कुटुंबांना तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. ५ जुलै) रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत 2D Echo व बालहृदय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील प्रख्यात बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशुतोष सिंह बालरुग्णांची तपासणी करणार असून, आवश्यकतेनुसार 2D Echo चाचणी, पुढील उपचार तसेच हृदय शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे असलेल्या बालकांना अत्याधुनिक तपासणी आणि उपचाराचा मार्ग एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच आरोग्यदूत फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश चिवट यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, बालहृदयरोगाचे वेळेत निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार शक्य होतात. मुलांना लवकर थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, वजन न वाढणे, तसेच ओठ किंवा नखे निळसर दिसणे अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.
अनेक पालक आर्थिक अडचणीमुळे मुलांची हृदय तपासणी करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांतील नागरिकांनाही या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. शिबिर रविवार, ५ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे होणार आहे.
“वेळेवर निदान – सुरक्षित बालपण, निरोगी हृदय – सुरक्षित भविष्य” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, या शिबिरासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला विश्वकोशीय मदत कक्षाचे विदर्भ प्रमुख प्रवीण शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप ठाकरे, संपर्क प्रमुख सत्यपाल कट्टरमार, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. संगीता राऊत, अमरावती संपर्क प्रमुख मनीष अग्रवाल, जिल्हाप्रमुख रमेश उपलवार, निलकंठ गोडवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here