शाळेची पहिली घंटा खणखणली! धानोरा तालुक्यात प्रवेशोत्सव उत्साहात, CEO सुहास गाडे यांच्या हस्ते चिमुकल्यांचे स्वागत

115

शाळेची पहिली घंटा खणखणली! धानोरा तालुक्यात प्रवेशोत्सव उत्साहात, CEO सुहास गाडे यांच्या हस्ते चिमुकल्यांचे स्वागत
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०१ : तब्बल दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर ३० जून रोजी धानोरा तालुक्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा खणखणली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आणि उत्साहाने शालेय परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ अंतर्गत ‘चला, शाळेत जाऊ या!’ हा उपक्रम तालुकाभर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी तालुक्यातील दुर्गम रांगी व निमगाव येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. प्रथमच शाळेची पायरी चढणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
प्रवेशोत्सवानिमित्त शाळांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे, स्वागत कमानी, बॅनर्स आणि देखण्या मंडपाने परिसर सजविण्यात आला होता. पारंपरिक फेटे परिधान केलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले, “शिक्षण हे केवळ पाठांतरापुरते मर्यादित नसून ते आनंददायी, प्रवाही आणि गुणवत्तापूर्ण असावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि श्रमसंस्कारही रुजवावेत.”
धानोरा हा आदिवासीबहुल व दुर्गम तालुका असूनही प्रवेशोत्सवाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षणाविषयीची जागरूकता दाखविली. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने नवीन पाठ्यपुस्तके, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. नवीन साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
तालुक्यात शंभर टक्के पटनोंदणी आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रवेशोत्सवानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा धानोरा तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीची आशादायी आणि प्रेरणादायी सुरुवात ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here