कुरखेड्यात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १ : स्थानिक बेरोजगार युवकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कुरखेडा येथे सुरू असलेल्या सुरक्षा रक्षक भरती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस प्रा. लि. आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही भरती प्रक्रिया ३ जुलैपर्यंत नगरपंचायत सभागृहात सुरू राहणार असून, पात्र उमेदवारांना निवडीनंतर तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात येत आहे.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत तसेच पसारा ॲक्ट-२००५ नुसार आयोजित या भरती मोहिमेचे उद्घाटन माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेले यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा अनिताताई बोरकर, पुंडलिक देशमुख, अनिकेत आकरे, जयेंद्र चंदेल यांनी युवकांना मार्गदर्शन केले. अशोक कंगाली, अनिल उइके आणि शारदा गावडे यांचीही उपस्थिती होती.
भरती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. प्रारंभी १५ ते २४ हजार रुपयांपर्यंत वेतन, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी, वैद्यकीय सुविधा, पेन्शन तसेच शासन नियमानुसार विविध भत्त्यांचा लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PMVBRY) अंतर्गत पात्र उमेदवारांच्या बँक खात्यात १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
भरतीसाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण, वय १८ ते ४५ वर्षे, उंची किमान १६५ सेंमी, वजन ४८ किलोपेक्षा अधिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्राची प्रत व दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत. निवड झालेल्या उमेदवारांकडून नोंदणी शुल्क म्हणून ५०० रुपये आकारण्यात येणार आहे.
ही भरती प्रक्रिया ३ जुलैपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत नगरपंचायत सभागृह, कुरखेडा येथे सुरू राहणार असून, जास्तीत जास्त पात्र युवकांनी या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेंद्रसिंह चंदेले तसेच भरती अधिकारी महेशकुमार सरतापे आणि दिग्विजय मोहिते यांनी केले आहे. भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ९५५२२३८०५७ किंवा ८८८८६६९५९८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.













