माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त : जंगलात पुरून ठेवलेली लेथ मशीनसह शस्त्रनिर्मितीचे साहित्य नष्ट
– गडचिरोली पोलीस व सीआरपीएफची मोठी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटनेच्या उरलेल्या नेटवर्कला आणखी एक मोठा धक्का देत गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी गुप्तपणे पुरून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा शोधून काढत घटनास्थळीच नष्ट केला. या कारवाईमुळे माओवादी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रनिर्मितीच्या यंत्रणेलाच मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ जून रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक (सी-६०), प्राणहिता युनिट, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तुकड्यांनी बालबेडा जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली. २७ जून रोजी घेराबंदी करून परिसराची कसून तपासणी करण्यात आली असता, जमिनीत खोलवर लपवून ठेवलेला माओवादी साहित्याचा मोठा साठा उघडकीस आला.
कारवाईदरम्यान तब्बल ५ ते ६ टन वजनाची एक लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० नग १२ बोअर पाईप, २० रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी, नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील काळात वापरण्याच्या उद्देशाने हे साहित्य जंगलात गुप्तपणे साठवून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी २३ व २७ मे रोजीही अशाच प्रकारची यशस्वी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मितीचे साहित्य हस्तगत झाल्याने माओवादी संघटनेच्या उर्वरित यंत्रणेवर मोठा आघात झाला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी सहभागी जवानांचे विशेष कौतुक केले आहे.













