योग, संगीत आणि संस्कारांचा सुंदर संगम ; लॉयड्स राज विद्या निकेतनमध्ये दुहेरी उत्सव उत्साहात
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून लॉयड्स राज विद्या निकेतनमध्ये विविध उपक्रमांनी सजलेला प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. योग, संगीत आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या सौ. अर्चना जोशी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी निरोगी जीवनशैली, शिस्तबद्धता आणि सर्वांगीण विकासासाठी योग व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी संगीत विभागातील राहुल अमोरकर, कु. नुपूर रॉय आणि कु. मेघा देंघरे यांनी राग भूपालीचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर योग शिक्षक अभिषेक कोपुलवार आणि सौ. नूतन मुतकुरे यांनी विविध योगासने सादर करत त्यांचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले.
प्रकल्प संचालिका सौ. सुनीता मेहता यांनी दैनंदिन जीवनात योग आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याची गरज अधोरेखित केली. एलआयएफच्या संचालिका सौ. कीर्ती रेड्डी यांनी “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” असे सांगत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहन केले. तसेच व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दूरदृष्टीला पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चौधरी यांनी आपल्या संदेशात निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, असे सांगत सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप दलसू जोई यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. यावेळी कला विभागातील अमोल तिघरे, कु. मोनाली पांडीलवार आणि सुयश महाताव यांच्या सर्जनशील योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, सांस्कृतिक जाणीव आणि सर्वांगीण विकासाच्या मूल्यांना अधिक बळकटी मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.













