गडचिरोलीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त; पाच आरोपींना अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध साठवणूक करून विक्री करणाऱ्या टोळीवर गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २ लाख १५ हजार ७१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २० जून २०२६ रोजी गोकुलनगर येथील विवेक अवधराम गुप्ता याने आपल्या राहत्या घरात आणि भाड्याच्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा करून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष दोन्ही ठिकाणी धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू व संबंधित साहित्य आढळून आले. कारवाईदरम्यान ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’ची ८२ पाकिटे किंमत ४० हजार १२० रुपये, ३२३ किलो कच्ची सुपारी किंमत १ लाख ६१ हजार ५०० रुपये, ६७ किलो ‘ईगल शिशा खर्रा’ पन्नी किंमत १२ हजार रुपये तसेच इतर साहित्य किंमत २ हजार ९० रुपये असा एकूण २ लाख १५ हजार ७१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात विवेक अवधराम गुप्ता (२१), अरविंद अवधराम गुप्ता (३१), यश सुभाष चव्हाण (३१), अजय सतिश गेडाम (३१) आणि अनिकेत घनश्याम बांबोळे (२७), सर्व रा. गोकुलनगर, गडचिरोली यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. कपिल आगलावे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांच्या नेतृत्वात पोउपनिरीक्षक अतुल तराळे, प्रवीण बुंदे व पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













