११ वर्षांपासून फरार नक्षल समर्थक आरोपी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात
– खून, खुनाचा प्रयत्न व शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : माओवादविरोधी अभियानांतर्गत गडचिरोली पोलिसांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीला अटक करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकांवरील हल्ला आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या आरोपीला पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाईतून ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या माओवादविरोधी मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन असरअल्लीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दीर्घकाळापासून फरार असलेला बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) हा आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नडीकुडा गावाला घेराव घालून शोधमोहीम राबविली. दरम्यान, आरोपी शेतशिवार परिसरात आढळून आला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिसांच्या अभिलेखानुसार बापू जनगम हा ग्राम रक्षक दल (जी.आर.डी.) यादीतील आरोपी असून, माओवाद्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद आहे. अनेक वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता.
त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन असरअल्ली येथे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मनुष्यवध, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, खुनाचा प्रयत्न, मालमत्तेची हानी तसेच खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः २०१५ मध्ये दाखल झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात तो ११ वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील सहआरोपीला यापूर्वीच सत्र न्यायालय, गडचिरोली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत होती. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन आणि स्थानिक स्तरावरील माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश येत आरोपीला अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशान्वये त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत प्रभारी अधिकारी सपोनि. योगिराज जाधव, पोउपनि. प्रसाद पवार आणि पोलीस अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.













