चामोर्शी : अनधिकृत कापूस बियाण्यांच्या काळ्या बाजारावर धाड, 7.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

16

चामोर्शी : अनधिकृत कापूस बियाण्यांच्या काळ्या बाजारावर धाड, 7.20 लाखांचा मुद्देमाल जप्त
– भरारी पथक व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत बियाणे विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे करण्यात आलेल्या संयुक्त धाडीत अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री उघडकीस आली असून, 7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अडपल्ली चक परिसरात एका चारचाकी वाहनातून अनधिकृत व खुल्या स्वरूपातील कापूस बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा भरारी पथक व आष्टी पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून शनिवारी (१३) कारवाई केली.
कारवाईदरम्यान टाटा पंच वाहनातून 60 किलो अनधिकृत खुले कापूस बियाणे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची अंदाजित किंमत 1 लाख 20 हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टाटा पंच वाहनाची किंमत 6 लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गौरव बिटपल्लीवार (रा. मार्कंडा, ता. चामोर्शी) याच्याविरुद्ध जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय ग्यानीराम मेश्राम यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, बियाणे नियंत्रण आदेश 1983, बियाणे कायदा 1966 आणि बियाणे नियम 1968 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार (चामोर्शी), कृषी अधिकारी पवन मडावी (धानोरा) तसेच आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच प्रमाणित बियाण्यांची खरेदी करावी, संशयास्पद बियाणे विक्री आढळल्यास कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यातील बियाण्यांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here