शेतजमीन वाचवण्यासाठी महिलांचा हंबरडा ; “जमीन देणार नाही”च्या निर्धाराने १३ गावांचा एल्गार

22

शेतजमीन वाचवण्यासाठी महिलांचा हंबरडा ; “जमीन देणार नाही”च्या निर्धाराने १३ गावांचा एल्गार
The गडविश्व
चामोर्शी, दि. १० : जयरामपूर परिसरातील प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात सोमवारी ९ जून रोजी येनापूर येथे १३ गावांतील शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण समविचारी बैठक पार पडली. या बैठकीत महिलांचा आक्रोश आणि शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. पिढ्यानपिढ्या कसत आलेली शेती, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे भविष्य हिरावले जाण्याच्या भीतीने अनेक महिलांना सभेत अश्रू अनावर झाले.
“जमीन गेली तर आमचे सर्वस्व जाईल, आम्ही जगायचे कसे?” असा हृदयद्रावक सवाल उपस्थित करत महिलांनी शासनाला जमीन अधिग्रहणाचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली. आपल्या भावना व्यक्त करताना अनेक महिलांना रडू कोसळले. त्यांच्या वेदना पाहून सभास्थळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी एकमुखाने “जमीन देणार नाही” असा निर्धार व्यक्त केला. विकासाच्या नावाखाली सुपीक शेती हिरावून घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी अधिसूचनेविरोधात कायदेशीर हरकती दाखल करण्याचा निर्णय घेतला. शेती आणि गावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
बैठकीत परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी नोंदविलेली अभूतपूर्व उपस्थिती शेतकऱ्यांमधील तीव्र असंतोष, एकजूट आणि लढाऊ भूमिका अधोरेखित करणारी ठरली.
उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत स्पष्ट केले की, शेती हाच येथील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. औद्योगिक प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण तापले असून प्रशासनावरील दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #LandAcquisition #SaveFarmland #FarmersProtest #Jairampur #Yenapur #FarmerUnity #NoLandAcquisition #AgricultureFirst #RuralVoices #WomenForFarmers #ProtectFarmLand #VillageResistance #FarmerRights #MaharashtraNews #GadchiroliNews #IndustrialProject #LandRights #SaveVillages #WomenProtest #GroundReport

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here